Holi Pournima Utsav

होळीपौर्णिमा उत्सव आणि श्रीसाईनाथ

श्रीसाईसच्चरिताच्या ४० व्या अध्यायात सांगितलेल्या कथेप्रमाणे होळी पौर्णिमेच्या दिवशी साईबाबा साईनिवास मध्ये तसबीर रूपाने जेवावयास आले. १९१७ च्या होळी पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार ८ मार्च १९१७ ह्या दिवशी ही घटना घाडली. त्या होळीपौर्णिमेपासून साईनिवासमध्ये प्रतिमा स्वरूपातील साईनाथांच्या आगमनाप्रीत्यर्थ दरवर्षी होळीपौर्णिमा अत्यंत मंगलमय व पवित्र वातावरणात साजरी केली जाते.

 Aniruddha-Foundation-Holi-Pournima-Sai-Nivas-Utsav-Sai-Tasbeer

साईनिवासमधील होळी पौर्णिमा

पहिल्यांदा ही मूर्ती होळी पौर्णिमेच्याच दिवशी ठेवली जायची. पण मीनावहिनींच्या प्रेमळ इच्छेमुळे ती कायमस्वरुपी दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्या मूर्तीसमोर बसून ध्यान करता यावे, जप करता यावा म्हणून दाभोळकर कुटुंबियांकडून ह्या मूर्तीची मोठी प्रतिकृती सन १९९७ मध्ये श्रीअनिरुध्द बापूंनी स्थापन करून घेतली.

२८ मे १९९६ रोजी श्री. आप्पासाहेब दाभोळकर (हेमाडपंतांचे नातू) आणि सौ. मीनावहिनी दाभोळकर यांना श्रीसाईनाथांचे दर्शन झाले.

श्रीअनिरुद्ध बापूंनी ह्या उत्सवानिमित्ताने अनेक भक्तिमय उपक्रम साईनिवास येथे चालू केले.

Aniruddha-Foundation-Holi-Pournima-Sai-Nivas-Utsav

१) प्रतिवर्षी होळी पौर्णिमेच्या दोन दिवस आधी श्रीसाईसच्चरिताचे पारायण करून या उत्सवाची सुरुवात होते.

२) पारायणाच्या समाप्तीनंतर साई-निवासच्या आवाराभोवती दिंडी फिरवली जाते, त्यावेळी सतत गजर म्हटला जातो तो पुढीलप्रमाणे-

‘दिक्षित, शामा, हेमाड, बायजाबाई, नाना, गणू, मेघश्याम

ह्यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम.

३) साईनिवासच्या वर ॐ साईराम असे लिहिलेला ध्वज असतो. प्रत्येक होळीपौर्णिमेला तो बदलून नवीन ध्वजाची पूजा केली जाते.

४) साईनाथांची ही मूळ तसबीर पवित्र विधी करून पुजली जाते.

५) होलिकामातेचं ही पूजन केलं जातं. होळी पेटविल्यानंतर ॐ कृपासिंधू श्रीसाईनाथाय नम:। ह्या जपाचे पठण होते. होलिकामातेला पाच प्रकारची धान्य अर्पण केली जातात आणि त्यानंतर आरती केली जाते.

६) ह्या नंतरचा एक सुंदर भक्ति उपक्रम म्हणजे बुक्का (अबीर) लावणे. बापूंमार्फत बुक्का लावण्याची सुरूवात होते. प्रथम दाभोळकर कुटुंबीय आणि नंतर दर्शनाला आलेले सर्व भक्तगण एक दुसर्‍याला बुक्का लावतात.

७) ह्या कार्यक्रमाच्या वेळेलाच ‘ॐ साई शिवाय’, ‘ॐ साई रामाय’, ‘ॐ साई कृष्णाय नम:’ ह्या जपाचे अखंड पठण चालू करतात आणि मग तो जप संपूर्ण दिवसभर चालूच रहातो.

८) ह्या दिवशी संपूर्ण दिवसभर अखंड दिवा प्रज्वलित ठेवला जातो.

९) साईनिवास इमारतीच्या मागील बाजूस तुळशी वृंदावन व चौथरा बांधलेला आहे. तेथे सर्व श्रद्धावान सुदिप लावतात.

दर्शनाला येणारे श्रद्धावान पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. तसेच मोठ्या प्रमाणात गरीब व गरजूंना या पुरणपोळ्यांचे वाटप केले जाते.

Aniruddha-Foundation-Holi-Pournima-Sai-Nivas-Utsav

होळी पौर्णिमा २०१७ शताब्दी महोत्सव

Aniruddha-Foundation-Holi-Pournima-Sai-Nivas-Utsav

११ मार्च २०१७ रोजी होळी पौर्णिमा उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साईनिवासमध्ये एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाची रुपरेषा –

अ) ह्या पूजेच्या दिवशी सद्गुरु बापूंच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते रात्रौ १० वा. पर्यंत ॐ कृपासिंधू श्री साईनाथाय नम:। चा जप एक लाख आठ वेळा (१,००,००८) पठण केला.

ब) ह्या जपाच्या पठणाच्या वेळी श्री. आप्पासाहेब दाभोळकर व त्यांचे कुटुंबीय त्या मूळ, पवित्र साई तसबीरीवर तुळशीपत्र व बेलपत्र अर्पण करत होते. सर्व श्रद्धावानांना पठणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

क) ह्या उत्सवात श्रीसाईसच्चरीत ग्रंथाची पारायणाची सुरुवात ९ मार्च २०१७ ला झाली. त्यादिवशी (पहिला दिवस) १ ते २६ अध्याय श्रद्धावानांनी वाचले. दुसर्‍या दिवशी म्हणजे १० मार्च २०१७ ला २७ ते ५२ अध्यायांचे वाचन झाले. ११ मार्च ला साईसच्चिराताच्या शेवटच्या अध्यायाचे ५३ व्या अध्यायाचे वाचन पूर्ण झाले व पारायण पूर्ण झाले.

ड) ह्या शताब्दी महोत्सवानिमित्त १२ फेब्रुवारी २०१७ रोजी “श्रीपंचमुखहनुमत्कवचम्‌” चे १०८ वेळा पठण आयोजिले होते. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीशिवपंचाक्षर स्तोत्राचे १०८ वेळा पठण ठेवले होते. तसेच २५ फेब्रुवारी २०१७ रोजी १०८ वेळा श्रीसाईसच्चरित ग्रंथाचे पारायण आयोजित केले गेले.

असा हा होळीपौर्णिमेचा पवित्र दिवस म्हणजे ज्या दिवशी साईनाथ तसबिरीच्या रुपात साईनिवासमध्ये आले आणि त्यांनी तेथेच कायमचे वास्तव्य केले तो अदभूत दिवस होय!

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com