govidyapitham_tirthakshetra

परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पनेतून गोविद्यापीठम्‌ साकार झाले. ८/४/२००२ रोजी बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रीकृष्ण गोवर्धन गिरिधारी मुर्तीची स्थापना मंदिरात झाली व अखंड तेवत राहणारी धुनीकुंडही प्रज्वलीत करण्यात आले. १३/४/२००२ ते १५/५/२००२ ह्या कालावधीत ‘चैत्र उत्सव’ उद्घाटन सोहळा अतिशय पवित्र व उत्साही वातावरणात पार पाडला. हे क्षेत्र कोठिंबे, कर्जत येथे १६ एकर जमिनीवर बाधंले असून कर्जत रेल्वेस्टेशन पासून १६ कि.मी. अंतरावर आहे.

गोविद्यापीठम्‌ची उद्दिष्टे :

१) गोपालन विद्या,
२) गोविंदविद्या,
३) प्राचीन कला व संस्कृतीचा अभ्यास, संशोधन व विकास,
४) शारिरीक शिक्षण व प्राचीन युद्धकला त्यांचे शिक्षण
ह्या चारही गोष्टींबाबतचे पूर्ण अध्ययन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच गोविद्यापीठम्‌ची स्थापना परमपूज्य बापूंनी केली.

१) गोपालनविद्या : भारतीय संस्कृतीत गाईला विश्वरूप व परमेश्वरस्वरूप मानलं आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गाय, तिचे दूध, गोमूत्र, गोमय ह्या सगळ्या गोष्टींना जीवनात व औषधशास्त्रात महत्त्वाचं स्थान दिलं आहे.

कृष्णबंधू, श्रीबलरामाने त्याकाळी गीर गायींच्या ज्या पुनरुत्पादन प्रक्रियांचा प्रथम अवलंब केला त्या प्रक्रियांबाबत संशोधन व अभ्यास येथे केला जातो. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मानवजातीला विकास साधण्यासाठी श्रीकृष्णाच्या गोपालविद्येच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो.

२) श्रीगोविंदविद्या : गोविंद म्हणजेच श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व, त्याचे जीवन, त्याचे सामर्थ्य, त्याचे कार्य व त्याचे तत्वज्ञान हे सर्व अभ्यासणे म्हणजे गोविंदविद्या शिकणे.

३) प्राचीन व अतिप्राचीन भारतीय विद्या व श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाचे पुनरुज्जीवन :
कालौघात लोप पावलेल्या गोविद्या, गोमतिविद्या, गायत्रीविद्या तसेच पुण्य फलदायी मंत्र उदा. गोसोक्त, गोमतिमंत्र, सुरभिमंत्र, गायत्रीमंत्र यांचे पुनरुज्जीवन करणे हे ही एक ध्येय आहे.

४) शारीरिक शिक्षण, व्यायाम, प्राचीन युद्धकला :
हे सगळे त्याठिकाणी शिकवणे व बरोबरीने नैसर्गिक आणि ग्रामीण वातावरण जपणे हा संकल्प आहेच.

गोविद्यापीठम्‌चे स्थानमहात्म्य व अंतर्गत रचना :

१) गोविद्या अभ्यासक कक्ष – अर्थात श्रीकृष्ण मंदिर : येथे प्रवेश करताक्षणीच आपले लक्ष वेधून घेते ती गोवर्धन गिरीधारी श्रीकृष्णमूर्ती. येथील भगवान श्रीकृष्णाने डाव्या हाताच्या करंगळीवर उचलून धरलेला गोवर्धन पर्वत आज ही आम्हाला आमच्या रक्षणाची ग्वाही देतो.
या मंदिरातील खांब म्हणजे जणू गोप-गोपींनी पर्वत उचलून धरण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी केलेली प्रेमळ प्रार्थनाच! येथील परिक्रमा मार्गातील आपल्या डाव्या बाजूच्या खांबाकडून १० (दश) गुरुंच्या तसबिरींचे दर्शन होते.
परिक्रमा मार्गावर चालताना श्रीकृष्णमूर्तीच्या डाव्या बाजूकडील खांबावर आपल्याल १० श्रेष्ठ संतांच्या तसबिरींचे दर्शन होते.

२) पुष्करिणी तीर्थकुंड : श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर येईल अशा अंतरावर तीर्थकुंड बांधण्यात आले आहे. त्याच्या तीरावर मंदिरातील मूर्तीसमोर मुचकुंद व कदंब वृक्ष आहेत. गोवर्धन गिरीधारी श्रीकृष्णाला केलेल्या अभिषेकाचे जल त्या कुंडात सोडण्यात येते.

३) गरुडस्तंभ अर्थात पापविमोचक स्तंभ : पुष्करिणी तीर्थकुंड व गोविद्या अभ्यास कक्षाच्यामध्ये चौकोनी चौथर्‍यावर गरुडस्तंभाची स्थापना केली आहे. गरुडस्तंभाच्या टोकावर पूर्व व पश्चिम बाजूस मुचकुंद वृक्षाला व कृष्णभगवंताला नमस्कार करणारी गरुडमूर्ती आहे. स्तंभावरील गरुड आणि हनुमंत ही दोन्ही भक्तीदेवतेची प्रतीके आहेत.

४) ध्यानकुटीर : षट्‌कोनाकृती पाच ‘ध्यानकुटीर’ येथे आहेत. गोमयाने सारवलेल्या या ध्यानकुटीरात बसून ध्यान, मनन, चिंतन जेव्हा श्रद्धावान करतात तेव्हा ते एकाग्र होऊ शकतात. चित्त शुद्ध होते. षडरिपूंचा नाश होतो. ३ एप्रिल २००२ ते १२ एप्रिल २००२ ह्या १० दिवसांत ३३ जपकांनी या पाच कुटीरांत बसून मंत्रजप केले व ही कुटिरे सिद्ध केली.

५) धुनीमाता : दिनांक ८ एप्रिल २००२ रोजी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी गोवर्धनधारी श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर सायं ४ वाजता धुनीमातेची स्थापना केली. त्यानंतर बापूंच्या आज्ञेने सुचितदादांनी धुनी प्रज्वलित केली. तेव्हापासून ही धुनी अखंड प्रज्वलित आहे. ह्या धुनीतील उदी श्रीगुरुक्षेत्रम्‌ खार येथील धुनीकुंडात एकत्रित होते. संपूर्ण जगभर हा उदी-प्रसाद श्रध्दावानांना वाटला जातो.

६) तुलसी-वृंदावन : गोविद्यापीठम् येथे प्रवेश करताक्षणीच डाव्या बाजूला नारळ-बागेत परमपूज्य नंदाईने स्थापित केलेले तुलसीवृंदावन दिसते. असे हे तुलसीवृंदावन म्हणजे पावित्र्य, मांगल्य, भक्ती आणि शक्तीचे उगमस्थानच होय.

७) वडाचा पार : ह्या वडाच्या पाराजवळ ‘ॐ आदिगुरु गोपालक दत्तात्रेय पाहि माम्‌!’ हा जप केला जातो. येथील गवताळ भागात गोशाळेतील गायींना रोज मुक्तपणे सकाळी ७.३० ते ९.३० ह्या वेळात चरायला सोडतात.

८) द्वारकामाई : श्री साईनाथ १९१६ साली शिर्डी येथे ज्या द्वारकामाईत रहात असत त्यावेळी बाबांची जशी द्वारकामाई होती अगदी तशीच्या तशी द्वारकामाई या ठिकाणी बापूंनी स्थापित केली आहे. इथे परमपूज्य बापूंनी उदी देणार्‍या साईनाथांची मूर्ती स्थापन केली आहे. ह्या द्वरकामाईच्या भिंतींमध्ये उदीचा वापर केला आहे. ‘इथे बसून बाबांच्या मूर्तीकडे बघत ध्यान, चिंतन, अध्ययन कराल तेव्हा तुमच्यातील भक्तीला आपोआप बळ मिळणारच आहे.’

AIGV (अनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास)ची स्थापना गोविद्यापीठम्‌ येथे परमपूज्य बापूंनी केली आहे व हा प्रकल्प अतिशय मोठ्या प्रमाणात राबविला जातो.

दर शनिवारी व रविवारी ३ ते ४ उपासना केंद्रातील श्रध्दावान मोठ्या संख्येने इथे श्रमदानासाठी जातात व भक्ती-सेवेचा आनंद घेतात.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com