Dhangaddhinga1_1280x427

श्री साई-समर्थ विज्ञान प्रबोधिनी ह्या संलग्न संस्थेच्या विद्यमाने “धांगडधिंगा” हा कार्यक्रम मुला-मुलींसाठी आयोजित केला जातो. वय वर्षे ९ ते १२ ह्या वयोगटातील मुले ह्या १०-१५ दिवसांच्या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात.

संकल्पना

मुलांच्या सप्तगुणांचा विकास करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सद्‌गुरु अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली नंदाईने सुरु केलेला हा अभिनव उपक्रम आहे. “धांगडधिंगा’ ह्या शब्दाचा अर्थच असा की, कोणत्याही आडकाठीशिवाय मनमोकळेपणाने मुले त्याचा आनंद व्यक्त करू शकतील अशा विविध कृती, खेळ इ. नंदाईने १९९८ साली प्रथम “धांगडधिंगा” शिबिर आयोजित केले. गेल्या सतरा वर्षात २००० पेक्षा जास्त मुलांनी याचा लाभ घेतला आहे. दरवर्षी साधारण हे शिबीर मे महिन्यात आयोजित करतात व त्याचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो.

शिबिराचा हेतू

प्रत्येकाला जन्मत: काही सुप्त गुणांची देणगी मिळालेली असते. लहानवयातच त्या गुणांचा विकास होणं आवश्यक असतं. त्यांच्या दैनंदिन जीवनात शाळा, शिकवणी वर्ग, इतर क्लासेस आणि अभ्यास या गोष्टीच इतक्या महत्त्वाच्या ठरतात की सुप्तगुणांना वावच मिळत नाही आणि लपलेली कौशल्ये दिसून येत नाहीत. मुलांचं “बाल्य” हरवत चाललं आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमधून ही मुलांचा योग्य विकास व्हावा हा ह्या उपक्रमामागचा हेतू आहे. ह्या पार्श्वभूमीवर धांगडधिंगा शिबिर मुलांना त्यांच हरवलेलं बाल्य परत मिळवून देणारा जादुई उपक्रम आहे.

ह्या उपक्रमातील सर्व ऍक्टीव्हीटीज त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणार्या त्यांचा व्यक्तिमत्व-विकास करणार्‍या असतात.

धांगडधिंगामधील विविध उपक्रम –

शिबिरातील सहभागी मुला-मुलींमध्ये भक्ती ह्या लहान वयापासूनच वाढीस लागावी म्हणून प्रत्येक दिवशी वर्ग सुरु होताना व संपताना प्रार्थना घेतली जाते. गुरुक्षेत्रममंत्र व हनुमान चलिसा स्तोत्र तसेच हनुमत्कवच मंत्र त्या मुलांच्या दैनंदिन जीवनातील कायमस्वरूपी सवय बनून जाते.

विविध खेळ शिबिरात घेतले जातात. मैदानी खेळ, बैठे खेळ, स्मरणशक्तीचे खेळ असे विविध प्रकार असतात. विविध कौशल्याधारित क्राफ्टच्या वस्तू तयार करायला शिकविल्या जातात व करून घेतल्या जातात त्यातून मुलांची एकाग्रता वाढते. खाण्यापिण्याच्या आरोग्यवर्धक सवयी अंगी बाणविण्यासाठी उत्तम, आरोग्यदायी, पौष्टिक अन्नपदार्थ प्रत्येकाला दिले जातात.

तसेच मुलांना कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू बनवायला सांगितले जाते. मुलं मनसोक्त त्यात रंगतात. आनंद उपभोगतात. त्या वस्तू वाळवितात, रंगवितात व आपलीच कलाकृती पाहून हरखून जातात. शेवटच्या दिवशी त्याच प्रदर्शन भरविले जाते. सर्व शिबिरार्थींची एक दिवसाची सहल आयोजित करण्यात येते. ह्या सहलीतील गमतीजमती मुलांसाठी एक खजिनाच असतो.

एकूणच अशा धमाल परंतु सुनियोजित धांगडधिंगा शिबिराची पालक आणि मुलं नेहमीच प्रतिक्षा करत असतात. आपल्या मुलीला किंवा मुलाला संधी मिळावी अशी सतत मनात इच्छा धरत असतात.

पालकांचा अभिप्राय –

आपल्या पाल्यामध्ये दिवसेंदिवस होत जाणारे सुंदर बदल पालकांना आश्चर्यचकित करतात आणि मग पत्रांद्वारे, ई-मेलस्‌द्वारे, प्रत्यक्ष भेटीत हे सगळे मुलांमधील बदल त्यांचे गुणवर्णन सांगायला पालकांना शब्दही कमी पडतात. पालक निश्चिंत होतात आणि “अंबज्ञ” होतात.

खरोखर नंदाईच्या ह्या स्तुत्य उपक्रमाने प्रत्येक शिबिरार्थी मुलाला व मुलीला स्वयंशिस्त लागते, नंदाईच्या प्रेमात न्हाऊन निघालेली ही आजची मुलं उद्याच्या राष्ट्राचे खरे आधारस्तंभ आहेत आणि तेच आपल्या राष्ट्रांची प्रतिमा उज्ज्वल करणार आहेत.

विल्यम वर्डस्वर्थने म्हटलेच आहे की

“Child is the father of man’’… हे वाक्य ही मुलं सत्यात उतरवतील हे नक्की!

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com