रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्थानापासून सुरु होतो आणि ग्रामराज्य म्हणजे “ग्रामविकास” – श्रीअनिरुध्द बापूंनी ६ मे २०१० रोजी सांगितलेल्या रामराज्य या संकल्पनेचा मूलाधार आहे. म्हणूनच बापूंनी श्रीगोविद्यापीठम्‌, कोठिंबे येथे “अनिरुद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास” म्हणजेच AIGV ची स्थापना केली.

ग्रामीण जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरु शकणार नाही आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी भक्तीमय सेवेची जोड कशी आवश्यक आहे हे बापूंनी आपल्याला सांगितले आहे. गावातील उपेक्षित कष्टकरी समाजाला मदत करणे हा AIGV चा मुख्य उद्देश आहे आणि उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहेच पण त्याहीपेक्षा उत्पादनाचा खर्च कमी करणे व वैयक्तिक घरच्या गरजा बिनखर्ची भागविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. हे आपल्या कामाचे ब्रीदवाक्य आहे.

AIGV अंतर्गत गोविद्यापीठम्‌ येथे अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्रायोगिक तत्वावर गोष्टी सुरु करण्यात आल्या आणि भक्तीमय सेवाकार्याने एकएक पायरी पुढे सरकत आजचा कायापालट आपल्याला गोविद्यापीठम्‌ येथे पाहण्यास मिळतो.

२०१३ पासून AIGV अंतर्गत गोविद्यापीठम्‌ येथे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या कालावधीत सेंद्रीयशेती व पशुपालन यांचे वर्ग घेतले जातात. या निवासी पदविका वर्गात उपलब्ध साधनांतून संपन्नतेकडे नेणारी कमी खर्चाची, बिनविषारी शाश्वत शेती पद्धती प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात येते. या पदविका वर्गात आतापर्यंत मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद इत्यादी भागातून अनेक श्रद्धावान सहभागी झाले आहेत व त्या त्या उपासना केंद्रांतर्गत जवळील ग्रामीण भागात हे ग्रामविकासाचे कार्य पुढे नेण्यात येत आहे. तसेच संस्थेचे कार्यकर्ते ग्रामीण भागात जाऊन परसबाग, गांडूळ खत असे १/२ दिवसांचे Crash Course सुद्धा घेत आहेत.

लहान लहान योजना राबवत प्रगती साधायची आहे व गावगाव अविरोधाने कार्य करायचे आहे. ग्रामविकासातील पहिला आणि सोपा उपाय म्हणजे ‘परसबाग.’ परसबागेत आपल्याकडील उपलब्ध जागेत घरातील साधनसामग्री, स्वयंपाकातील पाणी यांचा सुयोग्य वापर करून रोजच्या आहारात लागणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या यांची ऋतुमानाप्रमाणे नियोजित लागवड करता येते. गावात मागच्या अंगणात अथवा घरासमोर असणार्‍या छोट्याशा जागेत तर शहरात हीच परसबाग स्वयंपाक घरात म्हणजेच Kitchen  Garden तर गच्चीवर म्हणजेच Terrace Garden म्हणून प्रचलित आहे.

AIGV मध्ये सेंद्रीय शेती पद्धती अवलंबिण्यात येते. त्यामुळे रासायनिक खते व किटकनाशके यावरील खर्च वाचतो. गांडूळखत, शेणखत, सोनखत, कंपोस्टखत बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आवश्यक असणारा निमार्क, दशपर्णीअर्क, जीवामृत, बीजामृत बनविण्यासाठी शिकवले जाते. तसेच या ठिकाणी Azolla प्रकल्प उभारला आहे ज्यामुळे शेतीला खत व गुरांना चारा मिळतो.

वनीकरणामध्ये उपयुक्त झाडांची माहिती दिली जाते. जी झाडे रेताड जमिनीत लावली असता दुष्काळी जमिनीचे रुपांतर सुपीक, जमिनीमध्ये करतात, जमिनीची धूप थांबवितात तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवतात.

पशुपालन अंतर्गत गायी, म्हशी, शेळीपालनाबरोबरच कोंबडीपालन, बटेरपालन, ससेपालन यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येते. ज्यात त्यांच्या आहारापासून स्वच्छता व आरोग्यबिमा पर्यंत सर्व माहिती पुरविण्यात येते.नुकतेच मातीविना शेती म्हणजेच Hydroponics या तंत्रज्ञानाचा वापर करून गायी-म्हशींना वर्षभर हिरवा व पौष्टिक चारा मिळावा यासाठी हरीतगृह अत्यंत कमी खर्चात यशस्वीरीत्या उभारले आहे. सेंद्रिय शेती अंतर्गत केळी, पपई, कलिंगड, भोपळा, आले, हळद, स्ट्रॉबेरी यांचेही उत्पादन घेण्यात येते.

आधी केले आणि मग सांगितले या तत्वानुसार आपले AIGV चे कार्य अविरत सुरु आहे. अध्यात्माचा पाया असल्यामुळे कार्य सुकर होत आहे. निर्धन कष्टकरी शेतकर्‍यांना घरगुती गरजा पुरविण्यासाठी आवश्यक ती माहिती दिल्यास व मदत केल्यास ग्रामीण विकास नक्की होणार व शेतकर्‍यांच्या आत्महत्येला आळा बसून सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापू सुजलाम्‌ सुफलाम्‌ असे रामराज्य आणणारच.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com