श्रीसाईसच्चरित पंचशील परीक्षा

           सर्व साईभक्तांसाठी श्री हेमाडपंत विरचित श्री साईसच्चरित म्हणजे एक अपरंपार आणि अमूल्य सामर्थ्याने भरलेले अनंत भांडार आहे. ‘श्री साईसच्चरित’ हा ग्रंथ फक्त श्री साईनाथांचे चरित्र नसून श्रीसाईनाथांच्या सान्निध्यात आलेल्या अनेक प्रकारच्या भक्तांनी सदगुरु श्री साईनाथांची कृपा कशी प्राप्त करून घेतली आहे याचा इतिहास आहे. हे तर साईभक्तांचेही चरित्र आहे, ज्याद्वारे आम्ही परमेश्‍वरी कृपा कशी संपादन करायची हे शिकू शकतो’, असे सदगुरु श्रीअनिरुद्धांनी पहिल्या ‘सत्यप्रवेश’ या ग्रंथातून सांगितले आहे.

          श्री साईनाथांनी श्री. गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ ’हेमाडपंत’ यांच्याकडून रचना करवून घेतलेला हा ग्रंथ श्रद्वावानांना मार्गदर्शक तर आहेच. शिवाय सांसारिक व पारमार्थिक विचारांचा, अनुभवांचा तो अनमोल चिरंतन ठेवा आहे. साईसच्चरितातील 50 व्या अध्यायातील पुढील ओवी हेच स्पष्ट करते.

भक्ताचिया परमहिता । स्वये निर्मोनि निजचरिता ।

हेमाडाचिया धरोनि हाता । कथा लिहविता श्रीसाई ॥

          अशा या साईसच्चरितावर आधारीत सदगुरु श्रीअनिरुद्धांनी पंचशील परीक्षेची घोषणा केली. तेव्हा अनेकांना आश्‍चर्य वाटले. साईसच्चरित ग्रथांवर आधारित ही परीक्षा कशी असेल? याचे स्वरूप काय असेल? याला कितपत प्रतिसाद मिळेल? असे अनेक प्रश्‍न श्रद्वावानांना पडले होते. पण सदगुरु अनिरुद्धांनी ही परीक्षा व हा अभ्यासक्रम ज्ञान मिळविण्यासाठी नसून भक्ती कशी करावी व या भक्तिमार्गात अधिकाधिक प्रगती करून चुकीच्या गोष्टी व चुकीच्या श्रद्धा दूर करून आपले जीवन सर्वार्थाने परिपूर्ण करण्यासाठी आहे, असे सांगितले. थोडक्यात ही परीक्षा भक्ती अधिक चांगली करण्यासाठी आहे, असे सदगुरु श्री अनिरुद्ध सांगतात.

Shree Sai Satcharitra Panchasheel Pariksha

          १९९७ सालापासून सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री साईसमर्थ विज्ञान प्रबोधिनी’ या संलग्न संस्थेमार्फत ‘साईसच्चरित’ ग्रंथावर आधारित पंचशील परीक्षा सुरू झाल्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी असे या परीक्षांचे पाच टप्पे आहेत.

१) प्रथमा परीक्षेत साईसच्चरिताच्या १ ते १० अध्यायांवर आधारित एकूण १०० गुणांचे चार प्रश्‍न असतात.

२) द्वितीया परीक्षेत ११ ते २० अध्यायांवर एकूण १०० गुणांचे तीन प्रश्‍न विचारले जातात.

३) तृतीया परीक्षेत २१ ते ३० अध्यायांवर एकूण १०० गुणांचे तीन प्रश्‍न असतात.

४) चतुर्थी परीक्षेत ३१ ते ४० अध्यायांवर आधारित एकूण १०० गुणांचे तीन प्रश्‍न विचारले जातात.

५) पंचमी परीक्षेचे स्वरूप खूपच व्यापक असते. पंचमी परीक्षेला दोन लेखी पेपर्स व एक प्रॅक्टिकल परीक्षा असा मोठा आवाका असतो. दोन लेखी पेपर्सपैकी एक पेपर एक्केचाळीस ते बावन्न अध्यायांवर आधारित १०० गुणांचा व तीन प्रश्‍नांचा असतो. तर दुसर्‍या पेपरमध्ये संपूर्ण साईच्चरितावर आधारित १०० गुणांचा एक मोठा प्रश्‍न विचारला जातो. प्रॅक्टिकल परीक्षेत अध्यात्म व विज्ञान यांचा अन्योन्यसंबंध स्पष्ट करणार्‍या प्रयोगांवर आधारित प्रश्‍न असतात.

१) ‘एका वाक्यात उत्तरे द्या’ चे पंचवीस प्रश्‍न (५० गुण)

२) साईसच्चरितातील व्यक्तिरेखेचे दिलेले चित्र ओळखून त्याबद्दलची माहिती लिहा (१५ गुण)

३) चित्रातील त्रुटी ओळखून प्रसंग वर्णन करा (५० गुण)

४) चित्रातील प्रसंग ओळखून त्याची माहिती लिहा (२० गुण)

५) प्रयोगांवर आधारित दोन प्रश्‍न असतात. त्यातला एक प्रश्‍न (१५ गुण) व दुसरा प्रश्‍न (५० गुण) असे लघुत्तरी व दीर्घोतरी प्रश्‍न असतात. वरील सर्व गुणांची बेरीज केल्यास पंचमी परीक्षेतील प्रॅक्टिकल पेपर २०० गुणांचा होतो. दोन लेखी पेपर्स शंभर गुण प्रत्येकी असे २०० व प्रॅक्टिकल २०० असे एकूण ४०० गुणांची परीक्षा असते.

          दर सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेसाठी कसलेही मूल्य आकारले जात नाही. सदगुरु श्रीअनिरुद्धांनी सुरू केलेल्या दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये या प्रश्‍नपत्रिका मराठी आणि बहुभाषिकांसाठी प्रकाशित होतात.

          दैनिक ‘प्रत्यक्ष’ मध्ये प्रश्‍नपत्रिका प्रकाशित झाल्यावर 20 दिवसांच्या कालावधीत त्यातील प्रश्‍नांची उत्तरे, त्या संदर्भातील कथा, व्यक्तिरेखा, त्यांना साईनाथांकडून मिळालेली शिकवण, साईनाथांचे माहात्म्य व साईनाथांच्या भक्तीमुळे जीवनात घडून आलेले सुंदर बदल याची अभ्यासपूर्ण मांडणी करायची असते.

Shree Sai Satcharitra Panchasheel exam

          सदगुरुंचे कार्य किती विविध पातळ्यांवर चालते, सदगुरुंचे भक्तांना आलेले सुंदर अनुभव व सदगुरुंच्या कृपाछत्राचे माहात्म्य देखील श्रद्वावान आपल्या पेपर्समधील उत्तरात लिहितात. यामुळे श्रद्धा, भक्ती, प्रेम अंतःकरणात खोलवर उतरते, रुजते आणि भक्तिमार्गाची वाट दृढ होते. परीक्षार्थी घरीच अभ्यास करून पेपर्स लिहून पोस्टाने ते ‘श्रीसाईमसर्थ विज्ञान प्रबोधिनी’च्या पत्त्यावर पाठवतात.

          सुरुवातीला या परीक्षा शाळांच्या केंद्रामध्ये व्हायच्या. पंचमी परीक्षेची प्रॅक्टिकल्स शिकविण्यासाठी वर्गही घेतले जायचे. स्वतः सदगुरु श्री अनिरुद्ध परीक्षार्थींना विज्ञान व अध्यात्म याबाबतचे प्रॅक्टिकल्स शिकवायचे. पंचमी परीक्षेच्या प्रॅक्टिकल्सचे स्पष्टीकरण, त्यांचा साईसच्चरित्रातील विविध प्रसंगांशी असलेला अन्योन्य  संबंध याबाबत सखोल मार्गदर्शन करणारे पुस्तकही संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. त्या आधारे पहिल्यांदाच पंचमी परीक्षा देणार्‍या परीक्षार्थीला प्रॅक्टिकलचे ‘जरनल’ (प्रयोगवही) पूर्ण करून द्यायचे असते.

          काळानुसार परीक्षेचे स्वरूप बदलले. पण परीक्षेला मिळणारा प्रतिसाद काही कमी झाला नाही. दरवर्षी हजारोंच्या संख्येंने श्रद्वावान ही परीक्षा आवडीने देतात. मुंबईबाहेर महाराष्ट्रासह परदेशातले श्रद्धावानही ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. सतत साईसच्चरितची परीक्षा दिल्यामुळे अनेक श्रद्वावानांच्या ओव्या तोंडपाठ झाल्या आहेत. अमुक अमुक ओवी या अध्यायातली आहे, हे अगदी ते अचूक सांगतात. हे या परीक्षेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

Shree Sai Satcharitra Panchasheel Pariksha

इतर परीक्षेप्रमाणेच हे पेपर तपासले जातात. परीक्षार्थींना गुण दिले जातात. या परीक्षेत काय लिहिले गेले आहे, हे तपासले जात नाही. तर तुमच्या लिहिण्यामागचा भाव तपासला जातो. सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळालेल्या परीक्षार्थींसाठी जानेवारी महिन्यात बक्षीस समारंभाचे आयोजन केले जाते. फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात या दोन्ही वेळी परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींपैकी विशेष प्रावीण्य मिळालेल्या परीक्षार्थींचा कौतुक समारंभ करून ट्रॉफी (पंचमीसाठी बरोबरीने प्रशस्तिपत्रकही) देऊन गौरव केला जातो. यावेळी अल्पोपहार व करमणुकीचा संगीत कार्यक्रमही आयोजित केला जातो.

Shree Sai Satcharitra Panchasheel Pariksha

          सदगुरु श्री अनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांसाठी या पंचशील परीक्षेचे आयोजन करून भक्ती, सेवा आणि प्रेम याचे भांडार खुले केले आहे.  सदगुुरुंनी कोणत्याही अपेक्षेशिवाय, विनामूल्य असा अलौकिक खजिना श्रद्वावानांना लुटण्यासाठी भरभरून दिला आहे. केवढी ही कृपादृष्टी! केवढा हा सहजधर्म!

          साईसच्चरितातून श्री साईनाथांच्या भक्तांचे चरित्र, त्यांना आलेले अनुभव, त्यांचे आचरण आणि श्रीसाईनाथांचा कृपाछत्रासाठी आल्यावर त्या भक्तांच्या जीवनात झालेले आमूलाग्र बदल समजत जातात. या सगळ्यातून सदगुरुतत्त्वाचे अकारण कारुण्य, लाभेवीण प्रीती व सदगुरुंच्या लीला उलगडत जातात. सदगुरुंच्या सत्य, प्रेम, आनंद या स्वरूपांचा व पावित्र्य आणि मर्यादा यांच्या अधिष्ठानाचा या परीक्षांमुुळे परिचय होत जातो.

          म्हणूनच प्रत्येक श्रद्वावानांने जीवनाचे सार्थक करणार्‍या या परीक्षा द्यायला हव्यात.

सदगुरु श्री अनिरुद्धांनी दिलेला साईभक्तिमार्ग

१) श्रीहरिगुरुग्राम – (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे) येथे प्रवचनस्थळी श्री साईनाथांची तसबीर ठेवलेली असते. ‘ ॐ कृपासिंधू श्री साईनाथाय नमः ’ हा जप सर्व श्रद्धावान 24 वेळा करतात.

२) सदगुरु श्री अनिरुद्धांनी श्री साईनाथांच्या अकरा वचनांपासूनच मराठी प्रवचनांना सुरुवात केली. हिंदी प्रवचनांमध्ये ही श्रीसाईसच्चरितावर आधारीत प्रवचने होती. प्रवचनानंतर होणार्‍या आरतीमध्ये श्रीसाईनाथांची आरती म्हटली जाते.

३) सद्‍गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शानाखाली श्रद्धावानांनी सर्वप्रथम १९९६ साली शिर्डी रसयात्रा केली.

४) सदगुरु  श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे साजर्‍या होणार्‍या रामनवमी उत्सवात ‘श्रीसाईसत्पूजन’ व ‘श्रीसाईनाथ महिमाभिषेक’ हे महत्त्वपूर्ण उपक्रम असतात.

www.saicharitra.com