श्रीललिता पंचमी उत्सव

आश्‍विन शुद्ध पंचमी म्हणजेच श्रीललिता पंचमी. सदगुरु श्रीअनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविंदानम्’ या ग्रंथाच्या २७व्या अध्यायामध्ये एक कथा येते. रावणाचा वध हे राम-अवताराचे कार्य पूर्ण करण्याच्या आड येणार्‍या दुर्गमाचा वध करण्यासाठी साक्षात माता महिषासुरमर्दिनी रामसैन्याच्या ठिकाणी प्रगटली. तिने तिच्या परशुने त्या काकरूपी असुराचा म्हणजेच दुर्गमाचा वध केला. हा दिवस होता, आश्‍विन शुद्ध पंचमी. या काकासुराचा अर्थात दैत्यराज दुर्गमाचा वध होताच आदिमाता महिषासुरमर्दिनीने तिच्या या लीलेचे वृत्त कळविण्यास व राम-रावण युद्धाचे पुढील वृत्त जानकीस वेळच्या वेळी कळविण्यासाठी आपल्या लाडक्या कन्येस-आह्लादिनीस ‘लीलाग्राही’ अर्थात ‘ललिता’ रूपाने तेथे पाचारण केले. भक्तमाता ललिता तिचे कार्य करू लागताच महिषासुरमर्दिनी अंतर्धान पावली.

ललितापंचमीचे माहात्म्य सदगुरु श्री अनिरुद्धांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे,

‘‘आपण कायम विस्मृतीच्या राज्यात जगतो. परमेश्‍वराच्या विस्मृतीत राहतो. माया जशी तुम्हाला खेळवते, तशी ती आपल्याला परमेश्‍वराच्या मोहातही पाडते. आपल्या आयुष्यात सदैव स्मृती जागृत करत राहते.” म्हणूनच ललितापंचमीला आपण या जानकीमातेची प्रार्थना करतो, ‘हे माते तू सर्व जगताची तारिणीमाता आहेस. तू इच्छापूर्तिवर्धिनी आहेस. तू थोडी तरी स्मृती मला दे. मी तुझ्याकडून मिळालेली स्मृती माझ्या जीवनात चांगल्या कार्यासाठी वापरीन.’ म्हणजेच जानकीमाता-सीता ही मूळभावाने परमेश्‍वराची स्मृती आहे. म्हणूनच ललिता पंचमीला या परमेश्‍वरी स्मृतीची उपासना करतात.

१९९९ सालापासून श्रीललितापंचमीचा उत्सव सदगुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकुल, जुईनगर येथे श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे साजरा केला जात आहे. गुरुकुल, जुईनगर येथे ललितापंचमीला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. आदिमाता महिषासुरमर्दिनीचे तिच्या मूळ स्थानावरील म्हणजेच मणिद्विपामधील मूळ रूप म्हणजे ललिताम्बिका स्वरूप. या उत्सवात श्रद्धावान दांपत्याकडून श्रीललिताम्बिका पूजन गुरुकुल, जुईनगर येथे केले जाते. अनेक श्रद्धावान या उत्सवात भक्तिभावाने सहभागी होतात.