सांघिक उपासना

“जेव्हा आम्ही सांघिक उपासना करतो तेव्हा उपासना करणार्‍या सर्वांच्या उपासनेची शुभ पवित्र स्पंदने एकत्र आल्यामुळे आमची प्रार्थना अनंतपटीने प्रभावी ठरते. सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पदंने उत्पन्न होतात, ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात. सांघिक प्रार्थनेमुळे आमचं पुण्य विभागलं जात नाही, तर उलट वाढतंच, नॉन-जॉमेट्रिकल पद्धतीने वाढतं”, या शब्दांत सांघिक उपासनेचे महत्त्व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) आपल्या प्रवचनामधून सांगितले आहे.

सांघिक उपासनेचे फायदे

१) सांघिक उपासनेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.

२) आपल्या भारत देशाला एक उत्तम समाज म्हणून प्रगत व्हायचे असल्यास समाजात सांघिक भावना असणे गरजेचे आहे आणि ही सांघिक भावना सांघिक उपासनेतून उत्पन्न करता येते, वाढवता येते.

३) समाजसेवा करताना जो अहंकार निर्माण होऊ शकतो, तो भक्तिमार्गात, संघभावनेत सहसा येत नाही.

४) सांघिक उपासनेद्वारे आपल्याला मानसिक शांती मिळते, एकाकीपणाची भावना व भय आपल्या मनास पोखरत नाही आणि आपलं मन:सामर्थ्य वाढून आपण परमेश्वरी मार्गावरचे कायमचे प्रवासी बनतो.

५) सांघिक उपासनेने समाजात एकतेची भावना, समानतेची भावना विकसित होते.

६) उचित मानसिक शक्तींचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्ती भयमुक्त जीवन जगू शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा व अर्थातच समाजाचा व राष्ट्राचाही आध्यात्मिक व भावनिक विकास होतो.

श्रीहरिगुरुग्राम व उपसना केंद्र येथील सांघिक उपासना

दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा) येथे सांघिक उपासना होते. उपासनेनंतर उपस्थित श्रद्धावानांना सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचे प्रवचन किंवा श्रद्धावानांना आलेले विविध अनुभव ऐकायला मिळतात. तसेच त्यानंतर सद्‍गुरुंचे दर्शन, कृपाशीर्वाद, कृपादृष्टी ह्यांचाही लाभ होतो.

मुंबई व उपनगरे, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर, तसेच भारताबाहेरही अनेक उपासना केंद्रे आहेत. अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावरही उपासना केंद्रे आहेत. तसेच बहुभाषिक उपासना केंद्रेही आहेत. या उपासना केंद्रांमध्ये दर शनिवारी सांघिक उपासना होते.

घरोघरी आणि कौटुंबिक स्तरावरील सांघिक उपासना

कुणाही श्रद्धावानाच्या घरी काही निमित्ताने एकत्र जमा झालेले श्रद्धावान नातेवाईक, मित्रमंडळी सांघिक उपासना करू शकतात. सद्‌गुरु पादुकापूजन सोहळा व सच्चिदानंदोत्सव हे एक उत्तम माध्यम सांघिक उपासनेसाठी खुले झाले आहे. गुरुचरणमास, श्रावण, मार्गशीर्ष ह्यांसारख्या महिन्यांमध्ये सद्‌गुरु अनिरुद्धांनी स्तोत्रपठण उपक्रम दिले आहेत. चैत्र नवरात्र, आश्विन नवरात्र यांसारख्या महत्त्वाच्या पवित्र काळात पूजा-पाठ, जप, स्तोत्र पठण ह्या सामूहिक उपासना श्रद्धावान एकत्र जमून करू शकतात.

संस्थेमार्फत साजर्‍या होणार्‍या विविध उत्सवांमध्ये सांघिक पठण आयोजित केले जाते. श्रावण महिन्यात सांघिक घोरकष्टोद्धरण पठण, तसेच गुरुक्षेत्रम् येथे वर्षातून एकदा सांघिक हनुमान चलिसा पठण सप्ताह श्रद्धावानांसाठी आयोजित केले जाते. तसेच सद्गुरुंप्रती अंबज्ञता (कृतज्ञता) व्यक्त करण्यासाठी श्रीहरिगुरुग्राम येथे ‘अनिरुद्धचलिसा’ या स्तोत्राचे १०८ वेळा सामूहिक अखंड पठण आयोजित करण्यात येते.

ऑनलाईन अनिरुद्ध डॉट टिव्ही (www.aniruddha.tv)

२०१४ च्या गणेशोत्सवापासून ‘अनिरुद्ध टिव्ही’ (www.aniruddha.tv) चे प्रक्षेपण सुरू झाले. ह्या वेबसाईटवरून इंग्रजी सांघिक उपासनेचे प्रक्षेपण दर रविवारी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळात केले जाते व श्रद्धावानांना जगभरातून ऑनलाईन उपासनेचा लाभ घेता येतो.

सदगुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांना सांगतात, “कलियुगात ’यज्ञेन..दानेन..तपसा’, म्हणजे रामरक्षा, हनुमानचलिसा, पंचमुखहनुमत्कवच मंत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र यासारखे आध्यात्मिक, सांघिक व वैयक्तिक स्तोत्रपठण. हाच तुमचा यज्ञ, हेच तुमचे दान आणि हीच तुमची तपस्या.

सांघिक उपासनाच तुमच्या दुष्प्रारब्धाचा नाश करणारी असेल व तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारी असेल आणि तुमचा हा आनंदच मलाही आनंदित करणारा असेल हे नक्की!”