दसरा उत्सव

     “दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्या सीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणे चुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमा विस्तारणे. आपल्या क्षमता, Capacity, Potency वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो.”

     सद्गुरु श्रीअनिरुद्ध यांनी २४ ऑक्टोबर २०१० रोजी दसर्‍याचे महत्त्व सांगताना ही माहिती दिली होती. दसर्‍याच्या दिवशी आपण सकाळी सरस्वती देवतेची आणि सांयकाळी शस्त्रांची पुजा करतो. याविषयी बोलताना ज्ञान आणि विज्ञानाची ही पुजा स्वत:चे कौशल्य आणि वाढविण्यासाठी असते, याविषयी खुलासा केला होता.

      वैदिक संस्कृतीनुसार अश्विन महिन्यातील पहिले नऊ दिवस ‘अश्विन नवरात्री’ म्हणून साजरी केली जाते व दहाव्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमी साजरा केला जातो. वैदिक संस्कृतीत साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा हा शुभमुहूर्त म्हणून ओळखला जातो.

    त्रेतायुगात प्रभु श्रीराम व रावण यांचे घनघोर युद्ध झाले तेव्हा आदिमाता महिषासुरमर्दिनीने ‘श्रीरामास विजय प्राप्त होईल’ असा वर दिला होता. पुढे आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या कृपेने श्रीरामांनी रावणावर विजय प्राप्त केला. या विजयाबरोबर श्रीराम १४ वर्षाचा वनवास संपून विजयादशमीच्या दिवशी अयोध्येस परतले होते. या विजयाचे स्मरण व सीमोल्लंघन करून विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा.

     प्रभु श्रीरामचंद्रांचा रावणावरील विजय हा सद्गुणांचा दुर्गुणांवरील विजय किंवा नीतिमत्तेच्या अनीतिवरील विजयाचे प्रतिक आहे. म्हणूनच दसर्‍याच्या दिवशी आपण ‘त्या विजयाचे  स्मरण’ या अर्थाने आजही साजरा करतो. सोन्याचे म्हणजे उत्तम गोष्टींचे प्रतिक म्हणून ‘आपटा’ या वृक्षाची पाने एकमेकांना देण्याची सांस्कृतिक प्रथा ह्या दिवशी सर्वजण पाळतात.

     त्रेतायुगातील रामायणाच्या काळानंतर आणि हजारो वर्षाच्या द्वापार युगानंतर, आत्ताचा काळ म्हणजे कलियुगाचा दुष्ट चक्राचा फेराच आहे. ह्या कालप्रवासात मनुष्याला पूर्वजन्मातील पापे व या जन्मातील चूका व दूष्कृत्ये यामुळे मिळणार्‍या दुष्प्रारब्धामुळे संकट व दुःखांचा सामना करावा लागतो. पण सद्गुरुकृपेने आम्ही जेव्हा संकटांचा यशस्वीपणे सामना करतो व दुष्प्रारब्धाच्या दलदलीतून वर येतो तोच आपल्या विजयाचा क्षण! असे विजयाचे सुवर्णक्षण म्हणजेच सोने!

     विजयादशमी फक्त कॅलेंडरमध्ये दाखविलेल्या दिवशीच साजरी करायची का? याविषयी दसर्‍याच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्ध यांनी सांगितलेच आहे.

         अश्विन महिन्याचा दहावा दिवस दसरा हा अत्यंत शुभ व पवित्र दिवस आहे यात शंकाच नाही. पण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात चांगली गोष्ट वाईटावर, नीतिमत्ता अनीतिवर विजय मिळविते तेव्हा तेव्हा व्यापकतेने हा विजयोत्सव साजरा केला पाहिजे. जेव्हा चांगल्या गोष्टींचे पारडे जड होत जाते तेव्हा तेव्हा नेहमीच वादविवाद, संघर्ष उफाळून येतात. परंतु अखेरीस सद्‌गुण, नीतिमत्ता अशा उत्कृष्ट गोष्टीच विजयी होतात. यासाठीच हा विजयोत्सव साजरा करायला हवा.

      माझी वाईटाशी लढण्याची ताकद जेवढी जास्त तेवढी परिणामी माझ्या विजयाच्या सुवर्णक्षणांची संख्याही जास्त! वाईटावरील विजयाच्या अशा सुवर्णक्षणांची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे. हीच खरी ‘सुवर्णाची खाण’……असा हा प्रत्येक सुवर्णक्षण म्हणजे ‘विजयादशमी’ !

दसर्‍याच्या उत्सवातील उपक्रम –

         ह्या दिवशी सर्व श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘विजयोपासना’ करतात. म्हणजे ह्या दिवशी श्रीअनिरुद्धांनी पुनर्जिवीत केलेल्या भारतीय प्राच्यविद्या प्रशिक्षणात अंतर्भूत असलेल्या आयुधांचे पूजन केले जाते. त्यात मुद्गल, दुग्गल (Dumb-bell), फरी-गदा, जोडकाठी, वेत, लाठी, लठ ह्यांचा समावेश असतो.

विजयोपासना –

१) रामरक्षा पठण – १ वेळा

२) हनुमानचलिसा पठण – १ वेळा

३) श्रीआदिमाता शुभंकरा स्तवन पठण – २४ वेळा

४) व त्यानंतर सर्व श्रद्धावान ‘ॐ कृपासिंधू महाबलोत्कट श्रीअनिरुद्धाय नम:।’ ह्या मंत्राचे ५४ वेळा पठण करतात.

या मंत्रजपानंतर दत्तावतार श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा गजर केला जातो.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ … महाराज / (आजोबा)…

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’

          या गजरानंतर आई चण्डिकेच्या श्रीप्रसन्नोत्सवात घेतलेला ‘जयंति मंगला काली भद्रकाली कपालिनी….’ (Audio Link) ह्या गजराने उपासनेची सांगता होते. या उपासनेत व गजरात सर्व श्रद्धावान अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने सहभागी होतात.

श्रीसरस्वती व श्रीमहासरस्वती पूजन –

           सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धावान आपापल्या घरी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे अतिश्रेयस्कर असे पूजन करतात. पूजनासाठी दगडी पाटीवरच बिंदू व रेषांचा वापर करून श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीच्या प्रतिमा रेखांकित केल्या जातात. (श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे चित्र देणे) दोन्ही चित्रे एकमेकांच्या बाजूला काढली जातात व त्यांचे पूजन केले जाते. यातूनच आपल्या भाग्योदयाची ऊर्जा मिळते असा श्रद्धावानांचा विश्वास आहे. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्या दोन्हींचे एकत्रीकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा होय.

दसर्‍याच्या ह्या विजयोत्सवाच्या दिवशी, ‘माझे दुष्प्रारब्ध, माझा अहंकार आणि षड्रिपुरूपी रावणाचा नाश करण्यासाठी माझ्या मनोभूमीत सद्गुरु भक्तीचा सेतु बांधला जाऊ दे’  अशी प्रार्थना सर्व श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्धांना करतात. मी वानरसैनिकाप्रमाणे भक्ती-सेवा व मर्यादापालनाचा स्वीकार केला की तो भक्तवत्सल सद्गुरु माझ्यापर्यंत येणारच व दुष्प्रारब्धरुपी रावणाचा नाश करणारच! कारण श्रद्धावानांचा विश्वास असतो तो अनिरुद्ध महावाक्यावरच!

अनिरुद्ध महावाक्य –

युद्धकर्ता श्रीराम: मम। समर्थ दत्तगुरु मूलाधार:।

साचार वानरसैनिकोऽहम्। रावणवध: निश्चित:॥