श्रीश्वासम् उत्सव

सोमवार, ४ मे २०१५ ते रविवार १० मे २०१५ ह्या कालावधीत श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे (पू) येथे सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या उपस्थितीत श्रीश्वासम् महोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला. बापूंनीच सांगितल्याप्रमाणे श्रीश्वासम् म्हणजे मानवांचं जीवन सुखी करण्याची भारतवर्षातील सत्ययुगामधील अत्यंत सुंदर पद्धती.

श्रीश्वासम् म्हणजे –   

सद्गुरु श्रीअनिरुद्ध सांगतात की, ‘श्रीश्वासम् म्हणजे – ‘दी युनिव्हर्सल हिलिंग कोड’ अर्थात्‌ शरीर, मन, प्राण व प्रज्ञा ह्या पातळींवर जे जे काही बिघडलेलं आहे, ते दुरुस्त करण्याची निरोगीकरण शक्ती म्हणजे ‘श्रीश्वासम्’. आदिमातेची अरुला अर्थात करुणाघन अनुग्रहशक्ती हीच ह्या विश्‍वातील सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट निरोगीकरण शक्ती आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्ध सांगतात, ‘‘श्रीश्वासम् हे आदिमातेचे श्‍वसन आहे. श्रीश्वासम् हा व्यक्तीगत तर आहेच, त्याचबरोबर तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी आणि मुख्य म्हणजे आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी आहे. तसाच तो जगातल्या प्रत्येक चांगल्या माणसासाठीही आहे.

श्रीश्वासम् महोत्सव देवता स्थापना

अंजनामातेला प्रार्थना केल्यानंतर बापू, आई, दादांनी परिक्रमा कक्षामध्ये ठेवलेल्या २५ तसबीरींचे पूजन करून तसबीरींचे अनावरण केले. त्या २५ तसबीरी म्हणजे

१) मूलार्क गणपती, २) आदिमाता महिषासुरमर्दिनी ३) अवधूत दत्तात्रेय ४) पंचमुखी हनुमान ५) आदिमाता नारायणी ६) आदिमाता अंबाबाई ७) आदिमाता बालात्रिपुरा ८) आदिमाता श्रीविद्या ९) आदिमाता रणदुर्गा १०) आदिमाता शारदांबा ११) आदिमाता भुवनेश्वरी १२) आदिमाता दंडनाथा १३) आदिमाता तुळजाभवानी १४) आदिमाता निसर्गमालिनी १५) आदिमाता रेणुका १६) आदिमाता महागौरी १७) आदिमाता महासिद्धेश्‍वरी १८) आदिमाता मीनाक्षी १९) आदिमाता अष्टभुजा २०) आदिमाता महायोगेश्वरी २१) आदिमाता आदिती अर्थात्‌ श्री २२) आदिमाता अनसुया-दुर्गा २३) आदिमाता सप्तश्रृंगी २४) श्रीत्रिविक्रम. २५) महाविष्णुच्या पाठीवर आलेखलेल्या कूर्मपीठाची तसबीर. ह्या कूर्मपीठाची मूर्तीसुद्धा मुख्य स्टेजवर चण्डिकाकुलात आदिमातेच्या चरणांजवळ ठेवली होती.

ह्या उत्सवात परिक्रमा कक्ष होता. त्यामध्ये पंचमुख हनुमंत व अश्विनीकुमारांच्या मुर्तींची स्थापना व पूजन बापूंनी केले. पुष्करणी कुंडाजवळ आदिमाता उषादेवीच्या तसबिरीचे पूजन केले व पुष्करणी तीर्थकुंडामध्ये त्रिविक्रमाची पंचधातुची मूर्ती ठेवली होती. जिच्यावर सतत पवित्र जलाचा अभिषेक होत होता. जवळ असलेल्या हॉलमध्ये महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमेची स्थापना व पूजन केले.

श्रीश्वासम् उत्सवास प्रारंभ – 

१) श्रीमूलार्क गणेशमंत्र, २) श्रीदत्तात्रेय स्तोत्रम्, ३) श्रीसूक्तम्, ४) पंचमुख हनुमंत स्तोत्र, ५) श्रीअश्विनीकुमार सूक्त, ६) उषासूक्त आणि ७) त्रिविक्रम गायत्री मंत्र

वरील सात मंत्र-स्तोत्रांचा मंगलध्वनी श्रद्धावानांच्या कानावर घेतच श्रद्धावान परिक्रमा करीत होते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी वैशाख पौर्णिमेच्या शुभदिनी श्रीश्वासम् बरोबरच श्रद्धावानांना दिलेली ही अपूर्व भेट होती. त्या त्रिविक्रम गायत्री मंत्राचा एक एक शब्द श्रद्धावानांना सुखावून गेला. तो सिद्ध मंत्र म्हणजे,

‘ॐ मातृवेदाय विद्महे। श्रीश्वासाय धीमही। तन्नो त्रिविक्रम प्रचोदयात्॥

एका कागदावर मूषकांची तीन चित्रे श्रद्धावानांनी काढावयाची होती. त्यानंतर आदिमातेला अर्पण करण्यासाठी देण्यात येणारे सूप घेऊन परिक्रमा केली जात होती. सूपामध्ये दोन वाट्यांमध्ये डाळ व तांदूळ, तीन केळी आणि पत्री देण्यात आली होती. परिक्रमा करताना श्रद्धावानांना एकूण २४ प्रतिमांचे दर्शन होत होते. सुपातील पत्री जलकुंडात अर्पण करावयाची होती तसेच सुपातून श्रद्धावानांना मिळालेले तांदूळ व डाळ व दोन केळी आदिमातेला अर्पण करावयाची होती. ही डाळ आणि तांदूळ पुढे संस्थेच्या अन्नपूर्णा योजनेसाठी वापरण्यात येत होते. तीन केळ्यांमधील एक केळे प्रसाद म्हणून श्रद्धावानाला देण्यात येत होते. यानंतर श्रद्धावान मुख्य स्टेजवरील चण्डिकाकुलाचे व बाजूला असलेल्या आदिमाता शताक्षी शाकंभरी तसेच आदिमाता अंजनामातेचे दर्शन घेत होते. शताक्षी शाकंभरीची सजावट उत्सवाचे सातही दिवस प्रत्येक दिवशी फळं आणि भाज्यांच्या आधाराने वेगवेगळ्या प्रकारे केली जात होती. ह्या निरंतर अन्न पुरविणार्‍या, गरजू, भुकेलेल्यांना उपाशी राहू न देणार्‍या शताक्षी शाकंभरी देवीचे दर्शन घेताना श्रद्धावानांचे मन आदिमातेच्या प्रेमाने भरून येत होते.

मुख्य स्टेजचे दर्शन घेण्यासाठी स्टेजजवळ जाताना व बाहेर पडताना श्रद्धावान तिथे उभारलेल्या ‘झाली’ खालून जात होते. परमपूज्य बापूंनी त्रिविक्रमाच्या अल्गोरिदम्सबद्दल प्रवचनं करताना समजावून सांगितलेल्या शुभ चिन्हांचा ह्या झालींवर समावेश होता. जणू ती ‘झाल’ म्हणजे आपल्या मोठ्या आईचा पदरच व आईच्या पदराचा प्रत्येक श्रद्धावानाला आसरा मिळत होता.

गुह्यसूक्तम

तीर्थजलाने भरलेला कुंभ हातात घेऊन, श्रीपंचमुख हनुमंत आणि श्रीअश्विनीकुमार यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या कक्षेत परिक्रमा करताना गुह्यसूक्तम् श्रद्धावानांच्या कानावर पडत होते. तीर्थजल तापी, इंद्रायणी व पांजरा ह्या नद्यांमधून आणण्यात आले होते. हे गुह्यसूक्तम् म्हणजेच ‘द हिलिंग कोड’ जे तुमच्या शरीरातील, मनातील कुठल्याही आजाराला बरं करण्यासाठी आवश्यक ती सर्व शक्ती पुरविते. कमीतकमी तीन परिक्रमा पूर्ण केल्यावर श्रद्धावान हातातील जलकुंभ घेऊन पुष्करिणी तीर्थाजवळ येऊन उषादेवीकडे व त्रिविक्रमाकडे बघत बघत कुंभातील तीर्थजल पुष्करिणी तीर्थामध्ये अर्पण करीत होते.

सप्तचक्रस्वामिनी महापूजन

उत्तर भारतीय संघ हॉलमध्ये मोठ्या आईच्या भव्य प्रतिमेसमोर सप्तचक्र-स्वामिनी महापूजन श्रध्दावानांकडून करण्यात आले.  महापूजनानंतर श्रद्धावान श्रीहरिगुरुग्राम येथे येऊन मुख्य स्टेजवरील शताक्षी शाकंभरी देवीसमोर शाक भाज्या, फळं व अंजनामातेसमोर खण अर्पण करीत होते. संपूर्ण ७ दिवस मुख्य स्टेजसमोर बसून रात्रपठणासाठीही श्रद्धावान उत्साहाने भाग घेत होते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी उत्सवाची सांगता ‘विश्वार्पण कलश’ सोहळ्याने केली.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com