पंढरपूर भावयात्रा

पंढरपूरच्या पवित्र श्रीक्षेत्री ५ मे २००१ रोजी संध्याकाळी सर्व श्रध्दावानांचे आगमन झाले आणि “बोला विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी” ह्या अंभगाचे बोलच जणू प्रत्येक श्रध्दावान अनुभवत होता. सर्व श्रध्दावानांच्या आनंदात भर पडली सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापू, नंदाई आणि सुचितदादा ह्यांच्या आगमनाने! त्यानंतर “संत ज्ञानेश्वर” हा चित्रपट सांघिकरित्या एकत्रितपणे पाहताना सर्वांचे अंत:करण भक्तीभावाने ओतप्रोत भरून गेले.

दुसरा दिवस म्हणजे मे २००१

श्रीअनिरुध्द बापूंनी सुंदर मार्गदर्शन केले, “रंगाने काळा कुळकुळीत असूनही विठ्ठलाला “पांडुरंग” म्हणून घेण्यामध्ये त्याची पहिली लबाडी आहे. संत त्याला एकाच वेळेस “सावळ्या पांडुरंगा” म्हणतात, किती हा विरोधाभास! तो एकाच वेळेस सावळा पण आहे आणि गोरा पण आहे आणि हेच ते तत्त्व आहे, ‘आकर्षण आणि विकर्षण’, ‘स्थिती आणि गती’, ‘पूर्ण अंध:कार आणि पूर्ण प्रकाश’ ह्या दोन्हींवर समानपणे नियंत्रण असणारा हा महाविष्णू जो आहे त्याचं हे पंढरपूर श्रीक्षेत्र आहे. ह्या क्षेत्राची महती फक्त ह्या विठ्ठलामुळेच नाही तर त्याच्याहीपेक्षा जास्त ह्या विठ्ठलावर प्रेम करणार्‍या त्याच्या भक्तांमुळे आहे. फक्त “तो (विठ्ठल) एक आणि मी एक” हेच नातं स्थिर होऊ दे, बाकी दुसरे काही नको.

श्री क्षेत्र पंढरपूर भावयात्रा उपासना –    

सर्वांना कलन मृत्तिका देण्यात आली, ज्यातून प्रत्येकाने सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांनी “हरि ॐ” म्हणून सुरुवात करून दिल्यापासून पुन्हा ‘‘हरि ॐ’’ म्हणेस्तोवर, प्रेमाने मुखाने “श्रीहरि विठ्ठल जय हरि विठ्ठल” हा गजर म्हणत, मनापासून शंख, चक्र, गदा आणि पद्म ही महाविष्णुची आयुधे जशी जमतील तशी बनविली. त्यानंतर पांडुरंग गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप सुरु असताना अर्चन द्रव्य श्रध्दावानांनी त्या आयुधांवर अर्पण केले. तो मंत्र असा –

पद्मनाभाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो हरि: प्रचोदयात्

त्यानंतर आयुधांवर तुलसीपत्रे वाहण्यात आली. त्यावेळी बापूंनी पांडुरंगाला, “हे देवा, ह्यातलं एक तरी आयुध माझ्या आयुष्यात येऊ दे आणि माझा (माझ्या प्रारब्धाचा) नाश करू दे” अशी प्रार्थना श्रध्दावानांना करायला सांगितली.

त्यानंतर श्रीअनिरुध्दांनी सर्वांना संध्याकाळी होणार्‍या श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रेची योजना समजावून सांगितली. २ टनी रथामध्ये आरूढ झालेली भव्य-दिव्य विठ्ठल मूर्ती जणू ह्या सगळ्या भक्तिमय वातावरणाला कौतुकाने न्याहाळीत होती. रथाच्या माथ्यावर डौलाने आरूढ झालेल्या भक्तशिरोमणि हनुमंताची छबी व “श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रा” हा नामनिर्देशक फलक असे दृश्य पाहून श्रध्दावानांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. सकाळच्या उपासनेदरम्यान सर्व श्रध्दावानांनी कलन मृत्तिकेपासून जी महाविष्णुची आयुधे तयार केली होती, ती देखील ह्या रथात विठोबाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली होती. भगवे फेटे धारण करून आणि हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय जय रामकृष्ण हरि’, ’माझा विठू माझा विठू माझा विठू विठू विठू विठू’, ’आला रे आला माझा सावळा विठ्ठल आला’ अशा बहारदार गजरांच्या ठेक्यावर नाचणार्‍या हजारो श्रध्दावानांनी आसमंत फुलून गेला होता. सदगुरु अनिरुध्द, नंदाई व सुचितदादांसह रथयात्रेचा संपूर्ण मार्ग चालत असल्याने गजरांच्या तालावर नाचत नाचत रथ ओढणार्‍या श्रध्दावानांच्या उत्साहाला उधाण आले होते. अनेक श्रध्दावान पारंपारिक वेषभूषेत ह्या रथयात्रेत सहभागी होऊन गजराच्या तालावर नाचत रथ खेचत होते. दुसर्‍या दिवशी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट सर्व श्रध्दावानांना दाखविण्यात आला.

तिसरा दिवस मे २००१

ह्या दिवशी सकाळी श्रध्दावानांसाठी श्री विठ्ठल दर्शन आयोजित केले होते. नामदेवाची पायरी, चोखोबांची समाधी आणि कान्होपात्रेचं दर्शन विठ्ठल दर्शनापेक्षा महत्त्वाचं आहे हे सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांनी श्रध्दावानांना समजाविले व त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घ्या असे आवर्जून सांगितले. त्यामुळे या लेकुरवाळ्या विठू माऊलीला भेटण्यासाठी आलेल्या सर्व श्रध्दावानांनी आधी नामदेवाच्या पायरीचे, चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तरट वृक्षरूपी कान्होपात्रेला मनोभावे प्रणाम केला आणि मगच विठ्ठलाच्या चरणी माथा टेकला.

त्यानंतर श्रध्दावानांना आपल्या मनातील पाप आणि अंहकाररूपी विषारी कालियाचे प्रतिकात्मक मर्दन करण्यासाठी शाडूची माती दिली गेली. त्यातून प्रत्येकाने माझ्याकडील पाप व अहंकार नाश पावून जाऊ देत अशी कृष्णरूपी विठ्ठलाला प्रार्थना करीत, सद्‌गुरु श्रीअनिरूध्दांनी दिलेला जप म्हणत व एक विशेष नामगजर ऐकत प्रतिकात्मक कालिया बनविला. नंतर स्वत:च या नामगजरातच त्याच कालियाचे मर्दन केले. स्वत:तील विषारी कालियाचे मर्दन झाल्याचा आनंद सर्व श्रध्दावानांनी ह्याच नामगजरात बेभान होत नाचून साजरा केला. गोपालकृष्णाच्या, विठ्ठलाच्या भक्तीत दहिकाल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दहिकाला उत्सव म्हणजे उत्साह व उर्जेने भरलेला सोहळा! श्रीकृष्ण भगवंताच्या ललकार्‍या देत आणि ‘गोविंदा रे गोपाला’ व ‘बोलो बजरंगबली की जय’ असे जयघोष करीत उत्साह व चैतन्याने भरलेल्या वातावरणात एकावर एक असे तीन थर लावून दहीहंडी फोडण्यात आली.

चौथा दिवस मे २००१ 

ह्या दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या उपस्थितीत प्रथम हरिपाठ झाला. वैशाख पौर्णिमेच्या ह्या पावन दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांनी वैशाख पौर्णिमेचे महत्त्व व ह्या दिवशीच्या उपासनेची महती विशद केल्यामुळे प्रत्येक श्रध्दावानाचा भाव उपासना करताना वृध्दिंगत झाला होता. सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या मार्गदर्शनानुसार सर्व श्रध्दावानांनी वैशाख पौर्णिमेची सांघिक उपासना केली.

चंद्रभागा तीरावर जाण्यापूर्वी सायंकाळी ५ वाजता सद्‌गुरु बापूंनी श्रध्दावानांशी थोडा वेळ संवाद साधला. चंद्रभागेच्या तीरी छोटेखानी परंतु आकर्षक असा मंडप घालून त्या समोरील व्यासपीठावर श्रीकृष्ण भगवंताचे मोहक चित्र लावले होते आणि ध्वनीक्षेपकांची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्त्री श्रध्दावान व पुरुष श्रध्दावान ह्यांची टिपरी खेळण्याची वेगवेगळी सोय करण्यात आली होती. रासाला सुरुवात होण्यापूर्वी सद्‌गुरु श्री‍अनिरुध्दांनी “खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे” ह्या अभंगातील ओवीने सुरुवात करून श्रध्दावानांशी पुन्हा थोडा वेळ संवाद साधला. भक्तांच्या मागे युगानुयुगे धावूनही, युगानुयुगे दुष्टांचा संहार करतानाही हा खेळिया श्रीकृष्ण मात्र जराही का थकत नाही ह्या संबंधी एक आख्यायिका बापूंनी श्रध्दावानांना सांगितली व श्रध्दावानांना टिपर्‍या खेळताना “मी श्रीकृष्णाचा गोप आहे” ह्या भावनेने मनापासून टिपर्‍या खेळायच्या असे बजावले.

चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर विठ्ठलाच्या नामगजराच्या तालात हा टिपर्‍यांचा रास रंगला होता, ज्यात आबालवृध्द सारेच रंगून गेले होते. नंतर खूप सुंदर फटाक्यांची आतिषबाजी करून आकाशात रंगांची उधळण झाली तर चंद्रभागेच्या तीरी भक्तीची उधळण झाली होती.

पंढरपूर भावयात्रेची सांगता

पंढरपूरच्या भावयात्रेच्या अखेरच्या दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या “देवा तू माझा आहेसच पण मला तुझे व्हायचंय” ह्या भावाने जगा, ज्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा होईल, प्रेमाने भरून जाईल” ह्या प्रेमळ, कळकळीच्या शब्दांना हृदयात घेऊन प्रत्येकजण  जड अंत:करणाने प्रचंड मोठं प्रेमाचं, आनंदाचं, देवावरच्या भक्तीतील भावाचं गाठोडं घेऊन पाझरत्या डोळ्यांनी निघाला होता, आपल्या जीवन प्रवासाचे रूपांतर निरंतर आनंदयात्रेत करण्यासाठी!

 

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com