सुरुवात

शिर्डी’ व ’अक्कलकोट’ ह्या पहिल्या दोन रसयांत्राचा आस्वाद घेतल्यानंतर सद्‌गुरु श्री अनिरुद्धांनी तिसरी रसयात्रा ’देहू-आळंदी’ अशी जाहीर केली. १९९८ मध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनी तर्फे पुन्हा या रसयात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. १ सप्टेंबर १९९८ रोजी रात्री १० वाजता देहू-आळंदीसाठी बसेस सुटल्या व दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता सर्वजण आळंदीला पोहचले. यावेळेस पहिल्या यात्रेच्या चौपट संख्येने श्रद्धावान देहू-आळंदी रसयात्रेत सहभागी झाले होते.

दिवस पहिला

बापूंनी प्रथम या रसयात्रेचं महत्व सांगितलं. आणि मग ज्ञानेश्वरी गाथा, श्री साईसच्चारित ह्या पवित्र ग्रंथांची पालखीतून मिरवणुक काढण्यात येणार होती, त्या दिंडीची अगदी साग्रसंगीत तयारी सांगितली. या ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढताना “ज्ञानोबा माऊली तुकाराम” हा गजर सुरु होता. या दिंडीला पंढरपूरच्या वारीचे स्वरुप आले होते.

संध्याकाळी सर्वांना ’कलनमृत्तीका’ देऊन आप्पा दाभोळकर (सद्यपिपा) यांनी  तयार केलेल्या शिवलिंगांचे पूजन झाले. श्रद्धावानांनी स्वतः बनविलेल्या माऊलीच्या पादुकांचे अर्चन द्रव्याने पुजन केले. रात्री सत्संगाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर रंगला.

दिवस दुसरा

दुसर्‍या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, अजानवृक्ष, हैबती बाबांची समाधी ह्या स्थानांचे दर्शन घेण्यात आले. आळंदी संस्थानाने बापूंचा सत्कार केला. त्यावेळी बापूंनी अतिशय हृद्य आठवणी सांगितल्या; निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चारही भावंडाच्या कष्टाच्या आणि भगवद्‌भक्तीच्या कथा सांगितल्या. संध्याकाळी ’अमृतमंथन’ उपासना झाल्यावर सर्वजण इंद्रायणी काठावर गंगापूजनाला जमले. इंद्रायणीला आळंदीची गंगाच मानली जाते. येथे गंगेची आरती करण्यात आली आणि आरतीनंतर प्रत्येकाने गंगेत दीप सोडले.

दिवस तिसरा

तिसर्‍या दिवशी सकाळी बापूंनी तुकोबा महाराजांची महती सांगितली व त्यानंतर आळंदीहून सारेजण देहूला निघाले. देहूत तुकाराम महाराजांचे मंदिर, वैकुंठगमन वृक्ष आदिंचे दर्शन घेण्यात आले. तीन दिवस प्रेमाची लयलुट करुन सर्व श्रद्धावानांचा परतीचा प्रवास सुरु झाल. निघताना सर्व श्रद्धावानांची पावले व अंतःकरण जड झाले होते. मुळात या रसयात्रेत सहभागी होऊन सारेच रसमय झालेले होते.

Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com